Sunday, 6 March 2011

एक थेंब

 



एक थेंब .... पानावर सजलेला..
हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..

एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला,
धरती चुंबनाच्या प्रतीक्षेत तहानलेला..

एक थेंब .. कमळाच्या देठावर आधारलेला,
ओघळण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..

एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला,
आपणच तळे झालो या आनंदाने भारावलेला..

एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला,
गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..

एक थेंब ... थेंबाथेंबातून बरसलेला,
शिस्तीच्या  आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..

एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला,
जिंकण्याची उमेद बाळगलेला..

एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला,
समांगाने फुलात उमलवून गेलेला..

एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला,
गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...

अन एक थेंब अखेर... आठवणीच्या स्पंदनातला,
ओल्या पापण्या अन ओल्या कडांतून मन ओलावलेला..

                                              ----डॉ.कल्पेश पाटील.

Sunday, 27 February 2011

एकही मित्र नाही असा माणूस
















एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रीला  एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

                                        --- डॉ. कल्पेश पाटील.